बदल्या करा अन् माल कमवा एवढाचं यांचा धंदा..!
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील या सरकारने एक रुपयाची मदत कोणाला केली नाही. समाजातील कोणत्याही घटकाला यांनी कवडीचीही मदत केली नाही. एवढी मोठी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. एका नव्या पैशाची मदत कोणाला केली नाही. राज्यातील हे महाविकास आघाडीचे सरकार रोज नव्या घोषणा करतं आणि दुसऱ्या दिवशी त्या घोषणा माघारी घेतं. म्हणून या सरकारचं नाव ‘पलटूराम सरकार’ असं म्हटलं पाहिजे असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी सडकून टीका केली.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम दादा देशमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार बाळा भेगडे, महापौर माई ढोरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील या सरकारने एक रुपयाची मदत कोणाला केली नाही. बारा बलुतेदारांना मदत नाही, गोरगरिबांना नाही, दुकानदाराला नाही, शेतकऱ्यांना नाही, महिलांना नाही, कोणालाच मदत केली नाही. समाजातील कोणत्याही घटकाला यांनी फुटक्या कवडीचीही मदत केली नाही. छोट्या छोट्या राज्यांनी आपले पॅकेजेस जाहीर केले आणि त्यांच्या जनतेपर्यंतही पोचवले. परंतु देशातील सर्वात समृद्ध राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले जाते. तेथील लोकांना फुटक्या कवडीची मदत या सरकारने दिली नाही.
“केवळ तुम्ही तुमच्या घरी राहा आणि तुमचे कुटुंब सांभाळा.. आम्ही आमच्या घरी राहतो आणि आमचे कुटुंब सांभाळतो” या व्यतिरिक्त कुठलेही काम राज्यात झाले नाही. कोरोनाच्या काळात भरमसाठ वीज बिल लोकांना आले. भाजपने त्यावर आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील बिले जमा केली. दोन खोल्यात राहणार्यांना ३० हजारांची बिलं आली. सरकारला आपण ते दाखवलं. मंत्री बोलले आम्ही बिल कमी करून देऊ आणि बिलात सवलत देऊ. मात्र आता राज्याचे ऊर्जामंत्री म्हणतात की वीज वापरली तर बिले द्यावीच लागतील कोणालाही एक रुपयांची सवलत मिळणार नाही.
हे सरकार रोज नव्या घोषणा करतं आणि दुसऱ्या दिवशी त्या घोषणा माघारी घेतं. एवढी मोठी अतिवृष्टी झाली शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. एकाही शेतकरी बांधवाला पैशाची मदत केली नाही. म्हणून या सरकारचं नाव ‘पलटूराम सरकार’ म्हटलं पाहिजे. कारण रोज नवीन घोषणा करायची आणि त्यावरून माघार घ्यायची. केवळ आश्वासने द्यायची आणि त्यावर टिकून रहायचे नाही. कुठलेही आश्वासन हे सरकार पाळत नाही. आज खरं तर त्यांची वर्षपूर्ती आहे. वर्षभरात यांनी काय काम केलं असं जर विचारलं तर वर्षभरात महाराष्ट्रातील चालू कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्र बंद पडला. यापेक्षा कुठली वेगळं कर्तुत्व या सरकारला दाखवता आलं नाही. महाराष्ट्राला पुढे नेईल असं कोणतही हिताचं काम या सरकारने केले नाही.
या सरकारचा एकच धंदा चालला आहे. मोठ्या प्रमाणात बदल्या करा आणि माल कमवा. याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम हे सरकार करत नाही. दलालांचा सुळसुळाट आहे. एका अधिकाऱ्याला चारचार जण फोन करतात, आम्ही तुमची बदली करून देऊ. अशा प्रकारचं प्रशासन आणि राज्याची अवस्था महाराष्ट्राने यापूर्वी कधीच पाहिली नाही. त्यामुळे खूप मोठा असंतोष महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी बोलताना व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group