पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा प्रा.शैलजाताई सांगळे, लायन्स क्लब ऑफ फिनिक्स पुणेचे अध्यक्ष मकरंद शाळीग्राम, सेक्रेटरी प्रदीप वडगावकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष चव्हाण, कवयित्री संगीता शाळीग्राम, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, शाला समिती अध्यक्षा डाॅ. निताताई मोहिते, शाला समिती अध्यक्ष नितीन बारणे, मुख्याध्यापक नटराज जगताप, प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनीताई बाविस्कर सर्व शिक्षक वृंद, थेरगाव सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते अनिकेत प्रभु, राहुल सरवदे व अन्य माजी विद्यार्थी आणि निबंध लेखन स्पर्धेतील बक्षीस प्राप्त विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ७२ व्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यानिमित्त भारतमाता पूजन व ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रगीत, ध्वजगीत गायनाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
यावेळी इ. ५ वी ते ८ वी साठी रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या ‘पवनामाई माझी माता’ या निबंध लेखन स्पर्धेतील दहा यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
कोरोना संकटाचे मळभ दूर होत पुन्हा नव्या उमेदीने शाळा सुरु होण्याच्या मार्गावर असल्याने आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी लायन्स क्लब ऑफ फिनिक्स पुणे यांच्या वतीने शाळेसाठी ऑक्सीमीटर तर स्वाधार IWC पुणे तर्फे बायोमेट्रिक युनिट व सॅनिटायझर युनिट शाळेला भेट देण्यात आले. तसेच विन्सस्पेक्ट टेक्नाॅलाॅजी प्रायव्हेट लिमिटेडचे M.D. दिपक पिंगळे यांच्या वतीने दत्तक पालक योजनेअंतर्गत सहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्यात आली.
तर सामाजिक कार्यकर्ते सुभाष चव्हाण यांच्या वतीने शाळेतील गायक कलाकार विद्यार्थिनी कु.संचिता काशीदे हिच्या गायन कलेला प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात आली. तसेच शाळेतील ग्रंथालयासाठी सुद्धा त्यांनी काही पुस्तकांची भेट दिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते सुभाष चव्हाण म्हणाले, सीमेवर लढणारे जवान महत्त्वपूर्ण आहेतच. मात्र प्रत्येकजणाला सीमेवर जावून लढायची गरज नाही. खरं तर भारतातील प्रत्येक नागरिकाने आपापले कर्तव्य जबाबदारीने बचावले तर ती सुद्धा देशभक्तीच आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मनोगत व्यक्त करताना प्रा. शैलजाताई सांगळे म्हणाल्या, गरज पूर्तीसाठी या पृथ्वीतलावर देवाने सर्वांना योग्य प्रमाणात सर्व काही दिलेले आहे. मात्र मनुष्याने हव्यासापायी पर्यावरणाचा र्हास केलेला आहे. त्याचाच विघातक परिणाम सर्व जग आज भोगत आहे. म्हणूनच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे योगदान देणे ही खरी देशसेवा आहे.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारणीच्या पुढील टप्प्याच्या कामाचा शुभारंभ आज होत आहे ही आनंदाची वार्ता सांगतानाच सर्वांनी सढळ हस्ते या कार्यात योगदान द्यावे असे नम्र आवाहन केले. तसेच संपूर्ण चिंचवडभूमीसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष व पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक मा. श्री. गिरीश प्रभुणे यांना केंद्र सरकार तर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असल्याने आनंद व्यक्त करत सर्वांनी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी शाला समिती अध्यक्षा निताताई मोहिते यांनी पीएचडी पूर्ण करत डॉक्टरेट ही पदवी संपादन केल्याबद्दल खिंवसरा पाटील शिक्षण संकुलाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत इ. ८ वी तील कु.संचिता काशीदे हिने गायलेल्या देशभक्तीपर गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. म्हणूनच कार्यक्रमाच्या अध्यक्षा शैलेजाताई सांगळे यांनी तिला पाचशे रुपये रोख रकमेचे बक्षीस दिले. तर इ. ३ री मधील कु.भूमिका खंडागळे हिने देशभक्तीपर सादर केलेल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली. तसेच सहशिक्षका नीता चव्हाण यांनीही देशभक्तीपर गीत सादर केले. इ. १०वी.मधील कु. साक्षी वराडे हिने विद्यार्थी मनोगत तर सहशिक्षिका मीना जाधव यांनी प्रजासत्ताकदिनाचे महत्व सांगणारे शिक्षक मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका माधुरी कुलकर्णी यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक श्री. नटराज जगताप यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका योगेश्वरी महाजन यांनी केले. सहशिक्षिका अंजली सुमंत यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
कोविड -१९ मुळे घरी असलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांना शाळेतील साजरा होत असलेला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहता यावा म्हणून कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणाची सोय यावेळी करण्यात आली होती.






















Join Our Whatsapp Group