पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रातील भटक्या समाजातल्या मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी आपले जीवन वेचणारे आणि आपल्या प्रभावी लेखनातून भटक्या-विमुक्तांच्या अपरिचित जगाचे वास्तव सातत्याने मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे यांना केंद्र सरकारचा “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने पिंपरी चिंचवडच्या नावलौकिकात भर पडली असून पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार विलास लांडे यांनी डॉ. गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे व शास्तीकर निर्मूलन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
चिंचवडगावात राहणारे गिरीश प्रभुणे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. भटक्या-विमुक्त समाजाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले आहे. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते अविरत कार्य करीत आहेत. वैदू, कैकाडी, पारधी इत्यादी समाजातील मुलांच्या कल्याणासाठी ते झटत असून चिंचवड येथील “पुनरुस्थान समरसता गुरुकुलम”मध्ये भटक्या समाजातील साडेतीनशे मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी ते विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आपल्या प्रभावी लेखनातून भटक्या समाजाचे अपरिचित वास्तव मांडले आहे.
क्रांतिवीर चाफेकर संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा अलौकिक ठसा उमटविणारे गिरीश प्रभुणे यांचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला आहे. त्यानिमित्त भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी गिरीश प्रभुणे यांचे अभिनंदन करून सन्मान केला.






















Join Our Whatsapp Group