पिंपरी (Pclive7.com):- कोणताही गाजावाजा न करता पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात हेल्मेट सक्ती लागू केल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात १७ हजार ८०६ दुचाकीस्वारांवर हेल्मेट न घातल्याने दंडात्मक कारवाई करून ८९ लाखांचा दंड वसूल केला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे पूर्वी सायकलींचे आणि आता दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. यापूर्वी पुणे शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा अनेकदा प्रयत्न पोलिसांकडून झाला. मात्र प्रत्येकवेळी दुचाकीस्वारांकडून त्यास तीव्र विरोध झाला. आधी शहरातील रस्ते ठीक करा आणि मगच हेल्मेट सक्ती लागू करा, असा उपदेशही देण्यात आला.
प्रत्येकवेळी हेल्मेट सक्ती बारगळली. हेल्मेटसक्तीची घोषणा होताच विरोध तीव्र होऊ लागतो. बहुधा याचाच बोध घेत पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी कोणताही गाजावाजा न करता हेल्मेट सक्ती लागू केली आहे. छुप्या मार्गाने ही सक्ती लागू केल्याने नागरिकांमधून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही.
अपघातातील बळींचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी अनेकदा वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लघंन केल्यास काही वेळाच हेल्मेटबाबत दंड आकारण्यात येत होता. आता मात्र सरसकट कारवाईला वाहतूक पोलिसांनी सुरवात केली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी २०१९ मध्ये १ हजार ५३ जणांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई केली होती. तर यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात तब्बल १७ हजार ८०६ जणांवर कारवाई केली आहे. हेल्मेट न घातल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. त्यानुसार यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांकडून ८९ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.






















Join Our Whatsapp Group