पिंपरी (Pclive7.com):- पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य यासारख्या मुलभूत सुविधांचा प्राधान्याने विचार करणार आहे. तसेच शहरातील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेऊन पिंपरी चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मानस नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार राजेश पाटील यांनी आज स्विकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे तसेच जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेबाबत काही नकारात्मक भाग असला तरी सकारात्मक चांगल्या गोष्टी देखील भरपूर आहेत. शहर झपाट्याने वाढत आहेत. आज देशातील नियोजनबद्ध शहरांचा विचार केला तर पिंपरी चिंचवडचे स्थान वरच्या क्रमांकावर आहे. आज आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सकारात्मक तसेच एक चॅलेज म्हणून मी बघत आहेत. आलो पदभार स्वीकारला म्हणून मी काही एकटा जादू करणार नाही. सर्वांचे सहकार्य त्यासाठी मिळायला हवे. शहरातील नागरिक, राजकीय यंत्रणा तसेच प्रशासकीय स्टाफ यांचे देखील सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. खूप काही बोलून लोकांच्या अपेक्षा वाढवण्यापेक्षा चांगले काम करून देण्यावर भर राहील. येत्या एक-दोन वर्षात त्या अनुषंगाने नक्कीच शहराचा कायापालट झालेला दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आयुक्त म्हणून लोकांसाठी नेहमीच उपलब्ध राहील. पारदर्शक कारभारावर भर राहील. कोणत्याही गैरकारभाराला थारा देणार नाही. जर कोणी चुकीचं काम करत असेल तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संवेदनशीलतेने विचार करून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी शहरातील गल्ल्यांमध्ये फिरून प्रभागात जाऊन नागरिकांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेणार तसेच अभ्यास करून पुढचं टार्गेट ठरवणार आहे. महापालिकेतील कारभार पेपरलेस करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असून महापालिकेच्या सर्व सेवासुविधा ऑनलाईन देणार आहे. एकंदरीतच एक चांगलं लोकाभिमुख प्रशासन देण्याबरोबरच जागतिक दर्जाचे शहर निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group