पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भारतीय जनता पार्टीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. रवी लांडगे, नितीन लांडगे यांच्यासह शुत्रघ्न काटे या तगड्या नगरसेवकांची स्थायी समितीत एंन्ट्री झाल्याने सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान सभापती पदाच्या रेसमध्ये रवी लांडगे यांच्यासह नितीन लांडगे यांचे नाव आघाडीवर आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील ८ सदस्यांची नुकत्याच झालेल्या महसभेत निवड झाली. त्यात भाजपाचे ४, राष्ट्रवादीचे २, शिवसेना आणि अपक्ष आघाडीच्या प्रत्येकी एक सदस्याची नियुक्ती झाली आहे. महापालिका पंचवार्षिकचे हे शेवटचे वर्ष असल्याने महत्वपूर्ण समजल्या जाणार्या स्थायी समितीत सदस्य होण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी ताकद लावली होती.
स्थायी समितीत भाजपाकडून नितीन लांडगे, रवी लांडगे, शत्रुघ्न काटे आणि सुरेश भोईर यांनी निवड झाली. तर राष्ट्रवादीने प्रवीण भालेकर आणि राजू बनसोडे यांना संधी दिली. तर शिवसेनेच्या मिनल यादव आणि अपक्ष आघाडीच्या नीता पाडाळे यांची वर्णी लागली.
भाजपातील जुने निष्ठावंत तसेच युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रवी लांडगे यांचे नाव सभापती पदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातून बिनविरोध निवडून येत भाजपाचे खाते उघडले होते. मात्र महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन देखील पहिल्या वर्षापासून त्यांना कुठलेच पद मिळाले नाही. त्यामुळे आता सभापतीपदी रवी लांडगे यांची वर्णी लावण्यासाठी भाजपातील जुना गट एकवटा असून जोरबैठका सुरू आहेत.
सभापती पदासाठी भोसरीतील नितीन लांडगे यांच्या नावानेही अचानक आघाडी घेतली आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे ते चिरंजीव आहेत. गेल्या ४ वर्षात त्यांना देखील कुठलेही पद मिळाले नाही. स्थानिक नेते मंडळींच्यातील नात्यागोत्याचा विचार झाला तर नितीन लांडगे यांच्या नावाला सर्वानुमते हिरवा कंदील मिळू शकतो.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवक शत्रुघ्न काटे हे देखील सभापती पदासाठी तीव्र इच्छुक आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. गेल्या चार वर्षात महापौर, सत्तारुढ पक्षनेतेपदानी त्यांना हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आता स्थायी सभापती पदासाठी ते प्रयत्नशील आहेत.
त्यामुळे आता सभापतीपदी रवी लांडगे, नितीन लांडगे आणि शत्रुघ्न काटे यांच्यात चूरस निर्माण झाली असून ऐंनवेळी अन्य कोणाचीतरी लॉटरी लागणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group