पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरातील नियम कडक केले असून, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याने महापौर उषा ढोरे यांनी विनामास्क सोमवारी रात्री एका कार्यक्रमात ‘रॅम्प वॉक’ केला.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. आता नियम मोडणाऱ्या राजकारण्यांवर कोण कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक निबंध नागरिकांवर आणले आहेत. त्यामध्ये कोणत्याही सभागृहात कार्यक्रमांसाठी दोनशे जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर कार्यक्रमासाठी एक आड एक अशी आसन व्यवस्था करावी. तसेच मास्क अनिवार्य करावा, असे नियम आहेत. मात्र, महापौर उषा ढोरे यांनी आयोजित कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन केले आले.
उद्घाटन सोहळा आणि रॅम्प वॉक, गौरव समारंभावेळी एकाही सदस्याने मास्क परिधान केला नव्हता. महापौर उषा ढोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी फॅशन का जलवा या गाण्यावर महापौर उषा ढोरे यांनी रॅम्प वॉक केला. या वेळी महापौरांनीही मास्क परिधान केलेला नसल्याचे दिसून आले. तसेच परीक्षक आणि पहिल्या रांगेतील मान्यवरांनीही मास्क घातलेले नव्हते.
यावेळी ५०० हून अधिक नागरिक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामध्ये कुठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नव्हते. शिवाय अनेक नागरिकांनी विनामास्क गर्दी केल्याचे दिसून आले.
एकाही पदाधिकाऱ्यांने घातला नाही मास्क..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार एक आड एक खुर्ची सोडून आसन व्यवस्था करणे अपेक्षित होते. तसेच मास्क अनिवार्य केला आहे. मात्र, नाट्यगृहातील सर्वच खुच्या फुल्ल झाल्या होत्या. तर जागा नसल्याने काही नागरिक घोळक्याने उभे होते. गर्दी असतानाही उपस्थितांनी मास्क परिधान केलेला नव्हते. या कार्यक्रमास शहरातील भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group