पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी आयसीयू युनिट तातडीने सुरू करावे अशी मागणी नगरसेवक रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात रवी लांडगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत भोसरी येथे रुग्णालय उभारण्यात आले आहे. हे रुग्णालय संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरलेले आहे. विशेषतः कोरोना काळात या रुग्णालयाचे महत्त्व आणखी अधोरेखित झालेले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नवीनच असलेल्या भोसरी रुग्णालयाला कोविड सेंटरमध्ये रुपांतरित करण्यात आले. तेथे कोरोना झालेल्या ५ हजारहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यासाठी महापालिकेचे प्रशासन तसेच डॉक्टर आणि इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. परंतु, हे सर्व होत असताना या रुग्णालयातील एका गैरसोयीकडे आपले आणि आपल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा पत्रप्रपंच आहे.
भोसरी रुग्णालयात आयसीयू युनिटची कमतरता आहे. या रुग्णालयात गंभीर आजाराचे अनेक रुग्ण दाखल होत आहेत. अशा रुग्णांसाठी आयसीयू युनिटची अत्यंत गरज असते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु, रुग्णालयात आयसीयू युनिट नसल्यामुळे गंभीर रुग्णांना एक तर महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात पाठविले जाते किंवा या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागतो. त्यामुळे गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना खर्च आणि वेळ दोन्ही वाया जात आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आयसीयू बेड असणे नितांत गरजेचे असते. परंतु, महापालिकेच्या प्रशासनाने आजपर्यंत या अत्यंत गरजेच्या गोष्टीकडे आजतागायत लक्ष दिले नसल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. भोसरी रुग्णालयात जागा उपलब्ध असूनही आयसीयू युनिट सुरू करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
एकीकडे कोरोना केअर सेंटर चालविणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची नाहक उधळपट्टी होत आहे. कोरोनाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दराने साहित्य खरेदी केली जात आहे. परंतु, भोसरी रुग्णालयासाठी गरजेचे असलेले आयसीयू युनिट काही लाख रुपये खर्चून उभे करण्याचा प्रयत्न प्रशासन करत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. याआधी भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव रचण्यात आला होता.
परंतु, संपूर्ण भोसरीकरांना रस्त्यावर उतरून केलेल्या विरोधानंतर रुग्णालय खासगीकरणाचा डाव उधळला गेला. हा राग अद्यापही काहींच्या मनात आहे. त्यामुळेच झारीतील शुक्राचार्यांनी भोसरी रुग्णालयात आवश्यक असलेले आयसीयू युनिट उभे राहू नये यासाठी कटकारस्थान रचले आहे काय?, या कटकारस्थानाला महापालिकेचे प्रशासन बळी पडले आहे काय?, असे प्रश्न भोसरीकरांना पडलेले आहेत.
भोसरी रुग्णालयात आयसीयू युनिट सुरू केले जात नसल्याने महानगरपालिकेचे प्रशासन तसेच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींबाबत जनतेमध्ये नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे. महानगरपालिकेचा हजारो कोटींचा अर्थसंकल्प, कोट्यवधींच्या वाढीव खर्चांना मंजुरी, नको तेथे नाहक खर्च अशा गोष्टी होत असताना भोसरी रुग्णालयात काही लाखांचा खर्च करून आसीयू युनिट उभे करणे अशक्य नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून तसेच सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भोसरी रुग्णालयात तातडीने नव्हे तर युद्ध पातळीवर प्रयत्न करून आयसीयू युनिट सुरू करण्यात यावे.
अन्यथा भोसरीकर जनता पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तसेच नवीन भोसरी रुग्णालय हा एक अतिमहत्त्वाचा विषय महानगरपालिकेच्या महासभेत घेऊन तातडीने प्रलंबित असलेले खासगीकरणाचा प्रस्ताव रद्दबातल करावे आणि हे रुग्णालय जनसेवेसाठी कायमस्वरुपी महापालिकेनेच चालवावे, अशी मागणी रवी लांडगे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group