पुणे (Pclive7.com):- इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) घरात कोरोना व्हायरस टेस्टिंग करण्यासाठी कोविसेल्फ किटला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता कोणालाही अवघ्या २५० रुपयात घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट आणून कोव्हिड चाचणी करता येईल. विशेष म्हणजे फक्त १५ मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल हाती येणार आहे. ICMR ने मात्र विनाकारण चाचणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
चाचणी कोणी करावी?
पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट तयार केलं आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत किंवा ज्या व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली आहेत, त्यांनीच या किटचा वापर करावा, असा सल्ला या कंपनीने दिला आहे. RAT चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना कोरोनाबाधित म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. त्यांची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तर लक्षणं असूनही (सिम्पटमॅटिक) ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल, त्यांना कोरोना संशयित मानलं जाईल. ते स्वतःची आरटी-पीसीआर टेस्ट करु शकतात.
कसा वापर करावा? जाणून घ्या स्टेप्स
मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीच्या युजर मॅन्युअलनुसार,
१. नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांमध्ये २ से ४ सेमी आतपर्यंत टाकावे.
२. त्यानंतर नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांत पाच वेळा फिरवावे.
३. स्वॅब आधीपासून भरलेल्या ट्यूबमध्ये टाकावा आणि उरलेला स्वॅब तोडून टाकावा.
४. ट्यूबचे झाकण बंद करावे.
५. टेस्ट कार्डवर ट्यूब दाबून एकामागून एक दोन थेंब टाकावेत.
६. चाचणी अहवालासाठी १५ मिनिटं वाट पाहावी.
७. २० मिनिटांनंतर येणारा निकाल अवैध मानला जाईल.
टेस्ट कार्डवर दोन सेक्शन असतील. एक कंट्रोल, तर दुसरा टेस्ट सेक्शन. जर बार केवळ कंट्रोल सेक्शन ‘C’वर असेल, तर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे. जर बार कंट्रोल सेक्शन ‘C’ आणि स्ट सेक्शन ‘T’ या दोन्हीवर असेल, तर अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.
चाचणी झाल्यावर काय करावे?
हे टेस्ट किट एका आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल. हे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी आम्हाला पाच महिन्यांचा कालावधी लागला होता. आम्ही त्याची किंमत प्रतिकिट २५० रुपये ठेवली आहे. यात कर समाविष्ट आहे. किट वापरण्यास सोपे आणि जैविक कचरा निर्माण करणारे नसेल, असे त्याचे डिझाईन केले आहे. किटसोबत येणाऱ्या सेफ्टी बॅगेत टाकून तुम्ही ते डिस्पोज करु (कचऱ्यात टाकू) शकता, असं मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीचे एमडी हसमुख रवाल यांनी सांगितले.
टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी ५ से ७ मिनिटांची वेळ लागेल, तर निगेटिव्ह येण्यासाठी जास्तीत जास्त १५ मिनिटांचा वेळ लागेल. टेस्ट किटच्या पाऊचमध्ये आधीच भरलेली एक्स्ट्रॅक्शन ट्यूब, नेझल स्वॅब, एक टेस्ट कार्ड आणि सेफ्टी बॅग असेल. याशिवाय टेस्ट करणाऱ्या व्यक्तीला आपल्या फोनमध्ये मायलॅब कोविसेल्फ अॅप डाऊनलोड करावे लागेल. कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व व्यक्तींना होम आयसोलेशन, ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं पालन करुन काळजी घ्यावी लागेल.