पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील माॅडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज या कॉलेजमध्ये फी भरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा फॉर्म भरून दिला जात नव्हता. याबाबतची तक्रार येताच युवासेनेने काॅलेजमध्ये धाव घेतली. सर्व विद्यार्थ्याचे फॉर्म आज भरून घ्यावेत. अन्यथा युवासेनेच्यावतीने तीव्र आंदोलन कॉलेज समोर छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याबाबत सावित्रीबाई फुले विद्यापीठ युवासेना कक्षाचे सचिव निखिल येवले आणि सहसचिव गौरव असारे यांनी प्राचार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, निगडी येथील माॅडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज या कॉलेज मधील ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण फी भरली नाही, त्या विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिक्षा फॉर्म अजून दाखल करून घेतले जात नाही अशी तक्रार युवासेनेकडे प्राप्त झाली.
सध्या कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे फीसाठी अडवणूक करून कोणाचेही शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी. ज्या विद्यार्थांची आर्थिक परिथिती खूपच बिकट आहे असे विद्यार्थी परिक्षेदरम्यान अथवा निकालापूर्वी आपली संपूर्ण फी भरतील. त्यासाठी त्यांना सवलत देण्यात यावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील फीच्या कारणावरून कोणत्याही विद्याथ्यांचे फॉर्म थांबवू नये असे परिपत्रक काढले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे परिक्षा फॉर्म थांबवण्याची या कॉलेजची कृती बेकायदेशीर आहे. आम्ही आपणास या निवेदनाव्दाे विनंती करतो की, सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म आज भरून घ्यावेत. अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन पुणे कॉलेज समोर छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
निखिल येवले म्हणाले, याप्रकरणी काॅलेजने आश्वासन दिले आहे की, कोणत्याही विद्यार्थ्यांचे परिक्षा अर्ज अडवले जाणार नाहीत. लगेचच परिक्षा अर्ज दाखल केले जातील. व फी एक-रकमी न भरता हप्ता-हप्त्याने भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल.