पिंपरी (Pclive7.com):- लसीकरण केंद्रावर दिले जाणा-या टोकन पध्दतीबाबत नागरिकांचा वाढता रोष पाहता टोकन देण्याच्या पद्धतीत प्रशासनाने बदल केला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या KIOSK मार्फत प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या संकल्पनेनुसार पालिकेच्या आठही क्षेत्रिय कार्यालयांमधून KIOSK द्वारे केंद्रीय पध्दतीने टोकन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आजपासून सुरु केली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगातून कार्यक्षेत्रातील महापालिका हद्दीतील नागरिकांना (वयोगट – १८ ते ४४ व ४५ वर्षापुढील) मोफत कोविड लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत विविध लसीकरण केंद्रांद्वारे नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने व लसीकरण केंद्रांवर टोकन उपलब्ध करून देऊन लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लसीकरण केंद्रावर दिल्या जाणा-या टोकन पध्दतीबाबत नागरिकांचा रोष दिसून येत आहे. तसेच नागरिकांमध्ये वारंवार वाद विवादाचे प्रसंग उद्भभवत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या KIOSK मार्फत प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या संकल्पनेनुसार ८ क्षेत्रिय कार्यालयांमधून KIOSK द्वारे केंद्रीय पध्दतीने नागरिकांना टोकन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
KIOSK द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणक प्रणालीनुसार नागरिकांनी आपल्या भागातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन KIOSK मध्ये आपला मोबाईल क्रमांक, जन्म वर्ष, प्रथम अथवा द्वितीय लस इत्यादीची नोंद करून मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणारा OTP, KIOSK मध्ये नोंदवून आपली माहिती समाविष्ठ करू शकतात.
ही नोंद झाल्यानंतर संबंधित नागरिकांस KIOSK मधून छापिल टोकन क्रमांक प्राप्त होईल. तसेच टोकन क्रमांक SMS द्वारे नागरिकांस पाठविण्यात येईल. या पध्दतीने नागरिकांची लसीकरणासाठी नोंद झाल्यानंतर शासनामार्फत उपलब्ध होणा-या दररोजच्या डोस संख्येनुसार केंद्रीय पध्दतीने नागरिकांची निवड करून संगणक प्रणालीद्वारे SMS पाठवून नागरिकांनी निवड केलेल्या लसीकरण केंद्रामध्ये बोलविण्यात येऊन लसिकरण करण्यात येईल.
द्वितीय डोस बाबत ज्या नागरिकांचे कोविशिल्ड या लसीकरणासाठी ८४ दिवस व कोव्हॅक्सिन लसीकरणास २८ दिवस पूर्ण झाले असतील तरच त्यांना दूसरा डोस देण्यात येईल. या दिवसांची पूर्तता झाली नसल्यास संबंधित केंद्रावर नागरिकांना डोस नाकारण्यात येईल. नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय संबंधित मोबाईल क्रमांक नागरिकांस टोकन घेण्यासाठी वापरण्यात येणार नाही. नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सदर मोबाईल क्रमांक घरामधील इतर सदस्यांना टोकन घेणेकामी नागरिक वापरू शकतात.
केंद्रीय पध्दतीने लसीकरणासाठी निवड झालेल्या नागरिकांस प्रमाणित करण्यात आलेल्या लसीकरणासाठी जाणे शक्य न झाल्यास संबंधित नागरिकांस पुनश्च: नव्याने टोकन घेऊन प्रतिक्षा यादीमध्ये आपले नाव समाविष्ठ करावे लागेल. लसीकरण केंद्रावर नागरिकांना प्राप्त झालेला SMS अथवा KIOSK द्वारे देण्यात आलेली टोकन प्रत दाखवून त्याबाबतची खात्री झाल्यानंतरच लसीकरण करण्यात येईल.
नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेता सद्यस्थितीत लसिकरण केंद्रावर देण्यात येणारी टोकन पध्दत बंद करण्यात येणार असून यापुढे सर्व लसीकरण KIOSK संगणक प्रणालीद्वारे निर्गमित करण्यात येणा-या टोकन पध्दतीनुसार राबविण्यात येणार आहे.
तसेच KIOSK द्वारे उपलब्ध करून देण्यात येणा-या टोकन पध्दतीबाबत नागरिकांचा प्राप्त होणार प्रतिसाद विचारात घेऊन सदर KIOSK ची संख्या ही वेळोवेळी वाढविण्यात येणार आहे.
महापालिकेमार्फत नव्याने लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या टोकन पध्दतीचा शहरातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे अवाहन महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.