पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी आज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आयुक्त राजेश पाटील राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाची सुपारी घेऊन काम करत असून भाजपला अडचणीत आणत असल्याची टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दररोज पाणी पुरवठा करण्याची मागणी करत महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर संतापलेल्या महापौरांनी पत्रकार परिषद घेत थेट आयुक्तांवर निशाणा साधला.
महापालिका आयुक्त हे एका पक्षाच्या सांगण्यावरून भाजपचे प्रस्ताव अडवत आहेत, ते सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आयुक्तांनी सरळ तिकीट घेऊन निवडणुकीत उभे रहावे असेही त्या म्हणाल्या. याबाबत आयुक्तांनी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात आयुक्त महापालिकेत रुजू झाले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकूल भूमिका घेतली आहे. कोविड काळात रिक्षाचालकांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देणे, महापालिका शाळेतील मुलांना टॅब देणे, चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण महिलांना देणे असे सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या विषयांचे आम्ही प्रस्ताव आणले आहेत. स्थायी समिती सभेत ते मंजूरही केले आहेत. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून आयुक्त त्यांची अंमलबजावणी करत नाहीत. मुद्दाम अडवणूक करत आहेत. त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. आयुक्त असे मुद्दाम करतात की त्यांना काम करता येत नाही की त्यांना काहीच कळत नाही, अशी शंका येते असे महापौर ढोरे यांनी सांगितले.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, आयुक्त महापालिकेचे मालक असल्यासारखे वागत आहेत. कोविड काळातसुद्धा आम्ही भाजप पक्ष म्हणून चांगले काम केले आहे. आजही करत आहोत. मात्र, आयुक्त अडवणूक करत आहेत. पालकमंत्र्यांच्या दबावाखाली ते काम करत आहेत. त्यांनी कामकाजात सुधारणा न केल्यास त्यांच्या विरुद्ध आंदोलन केले जाईल. आयुक्तांवर भाजपचे आरोप- आयुक्त राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत, असे असेल तर त्यांनी निवडणूक लढवावी- विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी व महिलांना वाहनचालक प्रशिक्षण अशा नागरिक हिताच्या योजना आडवतात- आयुक्तांनी भाजप विरोधी सुपारी घेतली असून पक्षाला बदनाम करण्याचे षढयंत्र रचले आहे- आयुक्तांना मी पणा आहे, ‘मी सांगेन तेच फायनल’ अशी त्यांची भूमिका असते.
राष्ट्रवादीमुळे पाणी नाही – ढाके
शहरातील नागरिकांना महापालिकेतील सत्ताधारी भाजपमुळे पाणी मिळत नाही, असा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन केले. त्याबाबत ढाके म्हणाले, पंधरा वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत सत्ता होती. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आज पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता निवडणूक जवळ आल्यामुळे ते आंदोलन करत आहेत. आम्ही गेल्या पाच वर्षात भामा-आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याच्या कामाला गती दिली आहे. सध्या ९० टक्के काम झाले आहे. येत्या दीड-दोन महिन्यात पाणी प्रश्न सुटणार आहे.
























Join Our Whatsapp Group