पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि व्यापक जनसहभागातून साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून जगभरात योगाचे महत्त्व अधोरेखित झाले असून त्याच संकल्पनेला पुढे नेत भारतीय जनता युवा मोर्चाने शहरातील विविध भागांमध्ये योग दिनाचे भव्य आयोजन केले आहे.

शहरातील १४ मंडळांच्या माध्यमातून १४ विविध ठिकाणी एकाच वेळी योग दिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हजारो नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनमूल्ये समाजात रुजविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यमुनानगर-तळवडे, आकुर्डी-शाहूनगर, भोसरी-कृष्णानगर, संत तुकाराम नगर, वाकड-थेरगाव, रहाटणी-पिंपळे सौदागर, दिघी-भोसरी, चिंचवड-काळेवाडी, चिंचवड प्राधिकरण, मोशी-चऱ्होली, तळवडेवस्ती-इंद्रायणीनगर-नेहरूनगर, पिंपरी-फुगेवाडी-बोपखेल, सांगवी-पिंपळे गुरव आणि रावेत-वाल्हेकरवाडी या भागांमध्ये योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार आहे.

भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असलेल्या योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून आज योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून संपूर्ण जीवनशैली बनला आहे. वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता नियमित योगाभ्यासाची गरज अधिक अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराने शहरातील नागरिकांना योगाशी जोडण्याचा संकल्प केला आहे.
याबाबत माहिती देताना भाजयुमो पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी सांगितले की, “योग ही भारताची जगाला दिलेली महान देणगी आहे. प्रत्येक नागरिकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून निरोगी आणि सशक्त भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
योग दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराने ‘निरोगी युवा – सशक्त भारत’ हा संदेश देत आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून हा उपक्रम शहरातील सामाजिक आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group