पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापितांनी सर्वसामान्य नागरिकांच्या घामावर उभारलेल्या या शहरावर एकप्रकारे हुकूमशाही कारभार चालविला आहे. ‘हम करे सो कायदा’ या उक्तीनुसार महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आपली घरे भरण्याचा कार्यक्रम या प्रस्थापितांनी केला असून या प्रस्थापितांविरोधात आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही ताकदीने उतरणार असल्याचा इशारा शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक युवराज दाखले आणि शहराध्यक्ष सचिन लिमकर यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कै.भा.वि. कांबळे पत्रकार कक्षात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशाही व्यापारी संघटनेने आपली भूमिका मांडली.
यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेंद्र पांडे, डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ. जाधव युवा नेतृत्व संतोष कुरवत ,बलाराम चौधरी, कुणाल शिंदे,शुभम बिराजदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी बोलणे चालू आहे. या सर्वांना एकत्र घेऊन शहरातील जास्तीत जास्त जागा लढविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहरातील कष्टकरी, गोर गरीब कामगार वर्ग, झोपडपट्टीधारक यांचे प्रतिनिधित्व आम्ही करणार असून त्यांना न्याय देण्यासाठी व त्यांचा आवाज महापालिकेतील सभागृहात पोहचविण्यासाठी आम्ही ही लढाई लढणार असल्याचा निर्धार दाखले यांनी यावेळी केला.