पिंपरी : भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम स्थगित करून नवीन आराखडा तयार करून ‘मेट्रो’, राज्य सरकार आदींकडून नवीन आराखड्यास मंजुरी घेण्यात यावी. ‘मेट्रो’ने मंजुरी दिलेल्या आराखड्यानुसार येथील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
सादरीकरणात या नियोजित प्रकल्पांबाबत ठळकपणे माहिती नमूद करण्यात आलेली नाही. भक्ती-शक्ती चौकातील नियोजित प्रकल्पांचा या सादरीकरणात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटचा आराखडा या प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही, ही बाब स्पष्ट होते. परिणामी, भक्ती-शक्ती चौकातील नियोजित प्रकल्पांना या ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा अडथळा होण्याची शक्यता आहे. आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान ही बाब अतिरिक्त शहर अभियंता राजन पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी असमाधानकारक स्पष्टीकरण केले. भक्ती-शक्ती चौकात महापालिकेच्या ताब्यात मोठी जागा आहे. त्यामुळे या चौकात ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल, बीआरटीएस, मेट्रो आणि मोनोरेल सारखे अनेक प्रकल्प सहज राबविता येऊ शकतात, असे राजन पाटील यांनी त्यावेळी सांगितले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणारा मेट्रोचा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आणि पथदर्शी आहे. त्यामुळे हा प्रकल्प विना अडथळा पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे असतानाही या प्रकल्पाबाबत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. प्रकल्प राबविताना भविष्याचा विचार केला जात नाही. कासारवाडीतील नाशिक फाटा येथील उड्डाणपूल त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. नाशिक फाटा येथील उड्डाणपूल उभारताना मेट्रो किंवा तत्सम प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सध्याच्या मेट्रो प्रकल्पाला त्याचा अडथळा झाला. परिणामी मेट्रोचा मार्ग वळविण्यात आला. नाशिक फाटा येथे या उड्डाणपुलाला वळसा घालून मेट्रो मार्ग उभारण्यात येत आहे. ही खर्चीक बाब आहे आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीची आहे. राज्यातील काही शहरांतील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचे उड्डाणपूल पाडण्यात आल्याचे उदाहरण असतानाही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन याबाबत गाफील आणि उदासीन असल्याचे दिसून येते.
भक्ती-शक्ती चौक भविष्यात सार्वजनिक वाहतुकीचे मुख्य केंद्र अर्थात पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हब होणार आहे. त्यामुळे या चौकातील प्रत्येक प्रकल्पाचे काम दूरदृष्टीने होणे आवश्यक आहे. सध्याचा उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर देखील या सर्व बाबींचा विचार करून उभारणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका प्रशासनातील अधिकारी याबाबत जबाबदारीने कार्य करीत असल्याचे दिसून येत नाही. केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकल्पात आणि त्याच्या आराखड्यात त्रुटी असतानाही संबंधित प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे त्यांची कार्यशैली संशयाला बळ देणारी आहे. ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम देण्यात आलेल्या ठेकेदाराच्या हितासाठी संबंधित प्रकल्प आणि त्याच्या आराखड्याबाबत अधिकाऱ्यांकडून आग्रह होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकल्पाच्या आराखड्याबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाचे काम सुरू करण्याची घाई होत आहे. त्यामुळे या प्रकरणी शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता राजन पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरचे प्राथमिक स्तरावर सुरू करण्यात आलेले काम स्थगित करण्यात यावे. सध्याचा जुना आराखडा रद्द करून नव्याने आराखडा तयार करण्यात यावा आणि त्या आराखड्याची मेट्रो कंपनी, राज्य सरकार, केंद्र सरकार आदी तत्सम यंत्रंणांकडून मंजुरी घेण्यात यावी. त्यानंतरच भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी अमोल थोरात यांनी या निवेदनातून केली आहे.





















Join Our Whatsapp Group