पिंपरी (Pclive7.com):- पूर्व PCMT च्या ११७ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचे तसेच इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ देनेबाबतच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी निवेदन दिले आहे.
या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पूर्व PCMT चे एकूण २३५ कर्मचारी सन १९९९ मध्ये तात्पुरत्या स्वरुपात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे तत्कालीन आयुक्तांचे मान्यतेने वर्ग करण्यात आले होते. PMPML मधील एकूण २३५ कर्मचाऱ्यांपैकी ११८ कर्मचारी सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. उर्वरित एकूण ११७ कर्मचारी सद्यस्थितीत महापालिकेच्या सेवेत कामकाज करीत आहेत. या सर्व कर्मचारी यांची महापालिकेकडे जवळपास २० वर्षे सेवा झालेली आहे. त्यासर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, तसेच इतर कर्मचाच्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ देणेबाबतचा आदेश राज्यशासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी- छापवाले यांनी माहे मार्चमध्ये दिलेले आहेत.
PMPML मधील ११७ कर्मचारी अद्यापहि महापालिकेच्या सेवेत आहेत. त्यामध्ये चतुर्थ श्रेणीमधील शिपाई, हेल्पर, क्लिनर, वाहनचालक, लेबर इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य शासनच्या नगर विकास विभागाने PMPML च्या ११७ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सर्व लाभ देण्याचे आदेश उपसचिवांनी दिलेले आहेत. परंतु त्यातील ७ कर्मचारी दिनांक ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
तरी सदर PMPML कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना/ निर्देश प्रशासन विभागास देण्यात यावे अशी आग्रही मागणी संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.