पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरले आहे. काळजे यांच्या जात प्रमानपत्र पडताळणीच्या अर्जावर सुनावणी होऊन त्यांचा ‘कुणबी’ या जातीचा दावा समितीकडून वैध ठरविण्यात आला आहे. या निर्णयामुळे महापौरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी अँड. सुधाकर आव्हाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
नितीन काळजे यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र, महापौर काळजे यांनी सादर केलेला कुणबी जातीचा दाखला बनावट असल्याचा आक्षेप त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी नगरसेवक घन:श्याम खेडकर यांनी घेतला होता. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती.
त्यानंतर महापौर नितीन काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची चार महिन्यांत फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिली होता. त्यासाठी न्यायालयाने समितीला चार महिन्यांची मुदत दिली होती.
जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत दक्षता समितीसमोर तीन ते चार वेळा सुनावणी झाली. महापौर काळजे यांनी कुणबी जातीचे असल्याचे १६ पुरावे जोडले होते. त्यानंतर दक्षता समितीने त्यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.
याबाबत महापौर नितीन काळजे म्हणाले की, आपण कुणबीच आहे. प्रतिस्पर्ध्यांनी विनाकारण त्रास देण्यासाठी प्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता. अखेर सत्याचा विजय झाला आहे.