पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी कॅम्पपमधील नामांकित शाळा असलेल्या जयहिंद स्कूल बाहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांच्या नेतृत्वात आज धरणे आंदोलन करण्यात आले. गोरगरिंबांच्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जात नाही, विशिष्ठ वर्गालाच केवळ या शाळेत प्रवेश दिला जात असल्याचा आरोप निकाळजे यांनी यावेळी केला. तसेच या शाळेची मान्यताच रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

यासंदर्भात सुरेश निकाळजे यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.पुणे., शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे., संजय नाईकिडे शिक्षण प्रशासन विभाग पिं. चिं. मनपा. यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी कॅम्प येथील जयहिंद प्राथमिक व माध्यमिक शाळा ही मनमानी कारभार करत आहे. जयहिंद स्कूल पिंपरी कॅम्प या शिक्षण संस्थेत गरीब विध्यार्थ्यांना दाखल करून घेतले जात नाही. या शाळेत फक्त एका विशिष्ट वर्गाला ऍडमिशन दिले जाते. या शाळेत गोरगरीब मराठी मुलांना प्रवेश दिला जात नाही. मराठी व मागासवर्गीय लहान मुलांना शाळेतून काढून टाकण्यात येते व जबरदस्ती मराठी व मागासवर्गीय मुलांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जातो. म्हणून आज (दि.१६) जयहिंद स्कूलच्या मनमानी कारभारा विरुद्ध स्कूलच्या प्रवेशद्वारा जवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) व पिंपरी चिंचवड मधील पालकांच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. तरी सदर आंदोलनाची दखल घेऊन जयहिंद स्कूलच्या प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी निकाळजे यांनी केली आहे.

मागण्या खालील प्रमाणे
१) १ ते ५ वी नापास झालेल्या व शाळेतून काढून टाकलेल्या विध्यार्थ्यांना शाळेत पुन्हा प्रवेश दिला जावा.
२) गोरगरीब पिंपरी परिसरातील मुलांना जुनिअर ते ५ वी पर्यंत प्रवेश दिला जावा.
३) मराठी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसोबत भेदभाव न करता सर्वांना समान शिक्षण द्यावे.
४) जयहिंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची मान्यता रद्द करण्यात यावी.
५) जयहिंद स्कूल प्रशासनावर अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सुरेश निकाळजे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group