पिंपरी :- मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपला नाकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिला आहे. आतापर्यंत काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला असून भाजपला फक्त एकाच जागी यश आले आहे. शिवसेनेलाही एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. ८१ जागांपैकी ६७ जागांवर काँग्रेस तर भाजप ४, शिवसेना एका जागेवर आघाडीवर आहे. एमआयएमचा काँग्रेसला फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, या निकालावरून नादेंडकरांनी एमआयएमलाही नाकारल्याचे दिसते. एमआयएम, राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले नाही. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच सत्ता मिळवणार असा दावा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. पण निकालावरून भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम लागल्याचे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओवेसी बंधूंनी नांदेडमध्ये सभा घेऊन प्रचारात रंगत आणली होती. मंत्री संभाजी पाटील निलंगेकरही नांदेडच्या प्रचारात सक्रीय झाले होते.
शहरातील विकासात्मक कामे काँग्रेसच पूर्ण करू शकते, हा लोकांना विश्वास वाटला. त्यामुळेच त्यांनी आम्हाला स्वीकारले. विश्वासापोटी जनेतेने आम्हाला सत्ता दिली आहे. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. या प्रचाराला नांदेडकरांनी दिलेले हे उत्तर असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान, नांदेड महापालिकेसाठी बुधवारी ६० टक्के मतदान झाले होते. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपले नशीब आजमवत होते.