पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत व पक्षविरोधी कृत्य केल्याने राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहूल भोसले, जगदीश शेट्टी आणि फजल शेख यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शरद पवार गटाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकारिणीने अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार गटाने नऊ जणांची कार्यकारी समिती नेमली. आता अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या पदाधिका-यांना बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.
राज्याच्या शिंदे- फडणवीस सरकारमध्ये पक्षातील ९ आमदारांनी सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदारांविरोधात पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. त्याला पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. ही कृती पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत व पक्षविरोधी आहे. त्यामुळे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी आणि फजल शेख यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून, पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात आले आहे.