पिंपरी (Pclive7.com):- विम्याचे पैसे आले असून, त्यासाठी अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगत एका सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाची १३ लाख १६ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे दि.२० मे ते २० जुलै या कालावधीत हा प्रकार घडला.

सुभाषचंद्र कुणतीया आणि एक महिला यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ६६ वर्षीय व्यक्तीने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिलिटरी इंजिनिअरिंग सेवेत नोकरी करीत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दि.२० मे रोजी आरोपींनी फोन करून त्यांचे विम्याचे ८२ लाख ५० हजार ९१० रुपये आले असल्याचे सांगितले.
त्यानंतर हे पैसे मिळविण्यासाठी विमा फी कर आणि टीडीएस अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने त्यासाठी एकूण १३ लाख १६ हजार ९९५ रुपये भरले. मात्र त्यांच्या बँक खात्यात कोणतीही विमा रक्कम जमा झाली नाही. तसेच आरोपींनी फिर्यादीचे पैसेही परत केले नाहीत, असे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान तळेगाव दाभाडे परिसरामध्ये फसवणुकीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. फसवूणक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, अशी मागणी होत आहे.





















Join Our Whatsapp Group