पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिरातून श्रावण प्रतिपदेला निघणाऱ्या द्वारयात्रेला गुरुवारी (दि.१७) सकाळी नऊ वाजता गाजत प्रारंभ झाला. या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते.
श्रावण शुध्द प्रतिपदा ते श्रावण शुध्द चतुर्थी या चार दिवसांत व्दारयात्रा आयोजित करण्यात येते. गेल्या ४६० वर्षांपासून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे.
चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या हस्ते सकाळी मंगलमूर्ती वाड्यामध्ये विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व्दारयात्रेला प्रारंभ झाला. श्रावण प्रतिपदेला व्दारयात्रा पूर्वद्वार श्री मांजराई देवीकडे मार्गस्थ झाली.
एम्पायर इस्टेट येथील श्री मांजराई देवी मंदिराच्या विश्वस्तांनी व्दारयात्रेचे स्वागत केले. ही व्दारयात्रा देवीच्या मंदिरात पोहोचल्यानंतर देवीची पूजा, गोंधळ असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. या वेळी चिंचवड देवस्थानचे जितेंद्र देव, किशोर जोशी, विठ्ठल शिंदे, अप्पा कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी (दि.१८) दक्षिणद्वार वाकड येथील आसराई देवी मंदिर, शनिवारी पश्चिमद्वार रावेत येथील ओझराई देवी मंदिर येथे दर्शनासाठी जाणार आहे. रविवारी (दि.२०) उत्तर द्वार म्हणजेच समारोपाच्या दिवशी आकुर्डी येथील मुक्ताई देवी मंदिरात ही द्वारयात्रा काढण्यात येईल, अशी माहिती चिंचवड देवस्थानच्या विश्वस्तांकडून देण्यात आली.