पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजितदादा पवार उद्या (दि.२५) पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते शहरात येत असून जंगी स्वागत अन् सत्कार, महापालिकेत बैठक आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवार (दि.२५) रोजी सकाळी ९.४५ वाजता येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल रावेतकरांच्या वतीने मुकाई चौक येथे त्यांचे स्वागत आणि नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर १० वाजता वाल्हेकरवाडी येथे त्यांचे भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे. चिंचवडमधील चापेकर चौकात सकाळी १०.१५ वाजता चिंचवडकरांच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सत्कार होणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता चिंचवड स्टेशन येथे आणि १०.४५ वाजता मोरवाडी चौक येथे अजितदादांचे जंगी स्वागत अन् सत्कार करण्यात येणार आहे.

शहरातील प्रमुख चौकात जोरदार स्वागत झाल्यानंतर अजितदादा पवार हे पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय बैठक घेणार आहेत. पालिकेचे कामकाज, विविध प्रलंबित प्रकल्प, चालू कामे यांचा आढावा घेणार आहेत. तसेच राज्य सरकारशी संबंधित रखडलेली कामे देखील मार्गी लावण्यासंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेतील.

त्यानंतर चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तेथे अजितदादा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजितदादा उद्या पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.





















Join Our Whatsapp Group