पिंपरी (Pclive7.com):- सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टद्वारे हृदयरोग, कॅन्सर, किडनी, मेंदूचे आजार, गंभीर अपघातग्रस्त आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना तसेच नैसर्गिक आपत्ती पिडीतांना पिंपरी चिंचवड महापालिका आर्थिक मदत करणार आहे. यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला २५ लाख रुपये अनुदान देण्यास क्रीडा समितीने मान्यता दिली असल्याची माहिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी दिली.
क्रीडा समितीच्या पाक्षिक सभेत याला मान्यता दिली असून हा प्रस्ताव स्थायी आणि महासभेसमोर सादर करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका नागरीक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट याद्वारे शहरातील हृदयरोग, कॅन्सर, किडनी, मेंदूचे आजार, दुर्धर आजार, गंभीर अपघातग्रस्त, अनेक वर्ष विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना तसेच नैसर्गिक आपत्ती पिडीतांना मदत देण्यात येते. याकरिता महापालिकेकडून प्रतिवर्षी मिळणा-या २५ लाख रुपये अनुदान रकमेतून अर्थसहाय्य केले जाते.
१६ जून २०१७ च्या पत्रान्वये सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांतील अनुदान २५ लाख रुपये मिळण्यासाठी मागणी केलेली आहे. त्यानुसार ट्रस्टचा सन २०१६-१७ चा लेखापरिक्षण अहवाल विनियोग दाखला व लाभार्थीची यादी प्राप्त झालेली आहे. त्यानंतर या संस्थेस २५ लाख रुपये अदा करण्यास क्रीडा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी दिली.