पिंपरी (Pclive7.com):- चाकण नगरपरिषदेची प्रस्तावित हद्दवाढ करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयातील राज्याच्या नगरविकास विभागाला नुकताच पाठवला आहे. या प्रस्तावित करण्यात आलेल्या हद्द वाढीला लगतच्या ग्रामपंचायतींचा प्रखर विरोध पहावयास मिळत आहे. प्रस्तावित हद्द्वादीतील १६ गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांचा चाकण नगरपरिषदेत समाविष्ट होण्यास विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.२०) निघोजे ता.खेड येथे बैठक झाली. यावेळी हद्दवाढ विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
चाकण लगतचे ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. नगरपरिषदेच्या हद्दवाढीमध्ये कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे या गावांचा समावेश करून भविष्यात अनेक मोठ्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषदेची हद्दवाढ करून येथील यंत्रणा कार्यक्षम करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु ग्रामपंचायतींनी हद्दवाढीस विरोध तीव्र केला आहे.
सर्व ग्रामस्थ निघोजे येथील बैठकीतून ग्रामपंचायती अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहेत. पुढील दोन दिवसात यातील विविध ग्रामपंचायती ग्रामसभेचा ठराव करून राज्याचे मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री यांना निवेदने व ठराव घेऊन भेटणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले. जबरदस्तीने व स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता या बाबत निर्णय घेतल्यास आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
























Join Our Whatsapp Group