पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. आगीच्या घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी शहरभरात केंद्र उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. रावेत केंद्रासाठी ३० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.
शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. उद्योग, व्यवसाय व नोकरीसाठी नागरिकांचा पिंपरी-चिंचवड शहराकडे ओढा असल्यामुळे शहराच्या चारी बाजूस लोकवस्ती वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने शहराची लोकसंख्या फुगत आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी १८ अग्निशमन केंद्रांची गरज आहे. सध्या केवळ ८ केंद्र सुरू आहेत. आणखी दहा केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
रावेत भागात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निगडी, रहाटणी अग्निशमन केंद्रांवर अवलंबून रहावे लागते. रावेत येथील सर्व्ह क्रमांक ९६ येथील जलशुद्धीकरण केंद्राचे आरक्षण असलेल्या जागेतील १ एकर जागेत स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम, आरसीसी वर्क, प्लोरिंग वर्क, दरवाजे व खिडक्या बसविणे, आतील व बाहेरील प्लास्टर व रंगकाम, अंतर्गत रस्ते, अंतगर्त पावसाळी पाण्याची नलिका, अंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेजवाहिनी, विद्युतीकरण, अग्निशनम व्यवस्था आदी कामासाठी सुमारे ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास आयुक्त सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.