पिंपरी (Pclive7.com):- चहाच्या बिलावरून झालेल्या भांडणात मित्राला दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी गौस सय्यद शेख (२४, वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी मानतेश उत्तम याळगी (२०, रा. बिजलीनगर) याला अटक केली आहे. तर, त्याचे साथीदार अल्ताफ शेख, कमल चांडालिया आणि मुट्या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरोपींसोबत चहा पिण्यासाठी आकुर्डी स्टेशनजवळ गेले होते. दरम्यान, चहा पिल्यानंतर चहाच्या बिलावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर फिर्यादी घराकडे जात असताना आरोपी पाठीमागून दुचाकीवर आले. त्यांनी फिर्यादी यांना मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, आरोपी अल्ताफ याने रस्त्यावर पडलेल्या टोकदार दगडाने फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच, इतर आरोपींनी फिर्यादी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.
























Join Our Whatsapp Group