पिंपरी (Pclive7.com):- ‘देव-देश आणि धर्म’ याबाबत समाजामध्ये जागृती व्हावी हा विचार घेऊन रविवारी चऱ्होली बुद्रूक येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा दि.२२ जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे सर्व देशभर उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी च-होली गाव आणि बारा वाड्या, वस्ती तसेच सर्व सोसायटी मधील सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या पुढाकाराने च-होली बुद्रूक येथील श्री राम मंदिरामध्ये विविध धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शनिवार, दि.२० जानेवारी रोजी श्री प्रसाद माटे आणि शिष्य परिवार यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ ते ९ पार पडणार आहे. त्यानंतर रविवार, दि. २१ जानेवारी रोजी भव्य दिव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महर्षि वाल्मिकी रचित हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य ‘रामायण’ मधील प्रभू श्रीराम, माता सीता, बंधू लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान यांच्या भगवंत अवतारी चरित्रांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजावेत, या हेतूने रामायण वेषभूषा हे या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण असणार आहे. ही शोभा यात्रा सायंकाळी ५ ते ८ या वेळेत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक, च-होली फाटा ते च-होली गावठाण या मार्गावर पार पडणार आहे. शोभायात्रे नंतर श्री राम मंदिर येथे राम रक्षा, हनुमान चालीसा पठण होणार आहे. या शोभा यात्रे मध्ये परिसरामधील सर्व महिला भगिनी तसेच युवक आणि ज्येष्ठ मंडळीनी पारंपारीक वेशभूषा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने केले आहे.तत्पूर्वी श्री क्षेत्र अयोध्या येथून आणलेल्या हिंदू धर्म पताकांचे पूजन श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळी ठीक सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
त्या नंतर, सोमवार, २२ जानेवारी रोजी, च-होली श्री राम मंदिरा मध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज करंजीकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडणार आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत महाआरती आणि प्रसाद वाटप होणार आहे. त्या नंतर सायंकाळी ६ वाजता भव्य दिपोत्सव होणार आहे.
























Join Our Whatsapp Group