पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील वाकडमध्ये चालू बांधकामाची इमारत एका बाजूला अचानकपणे झुकली आहे. सध्या इमारतीला खालून सपोर्ट देण्यात आला आहे. मात्र ही इमारत जमीनदोस्त करावी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण ही इमारत कधीही खाली कोसळू शकते, अशी भीती स्थानिकांना आहे. त्यामुळं रात्री अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत स्थानिकांनी कळवलं आहे. दरम्यान या इमारतीचा परिसर खाली करण्यात आला आहे.
प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहून केली असता, स्थानिक म्हणतायेत तशीच परिस्थिती होती. महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही येऊन घटनास्थळी पाहणी केली. बांधकाम वाय पद्धतीचे म्हणजेच चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्यानं अशी परिस्थिती उदभवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुनील दोलवानी हे या इमारतीचे मालक असून मल्लिकार्जुन आंबेगावे हे आर्किटेक्ट आहेत. या इमारतीत तळमजला अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार, असा निष्कर्ष रात्री काढण्यात आलेला आहे. पण तातडीनं काहीच निर्णय घेणे शक्य नसल्यानं, तूर्तास इमारत पोकलेनच्या साह्यानं सरळ करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच खालून सपोर्ट ही देण्यात आला आहे. रात्री हे कामकाज थांबवण्यात आले असून आज महापालिकेकडून इमारत जमीनदोस्त करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
























Join Our Whatsapp Group