मंगेश सखाराम दाभाडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे), इलाही सैफन फरास (वय ४५, रा. धानोरी, पुणे), अनिल सतईराम जस्वाल (वय २८, रा. उत्तर प्रदेश), अमोल बाळासाहेब गराडे (वय ३१, रा. पिंपळखुटे, ता. मावळ), परशुराम उर्फ सोन्या धोंडिबा गायकवाड (वय ३६, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे टोल नाक्याजवळ शांताई हॉटेलच्या परिसरात विमानाला लागणारे इंधन (एटीएफ/जेट इंधन) टॅंकरमधून काढून त्याची विक्री करण्याचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. जागा मालक मंगेश दाभाडे याने टॅंकर चालक ईलाही आणि अनिल या दोघांशी संगनमत करून अमोल, परशुरामच्या मदतीने टॅंकरमधून जेट इंधन काढून घेत असताना पोलिसांनी पकडले.
आरोपींकडून १५४० लिटर एटीएफ/जेट इंधन, रिकामे प्लास्टिक कॅन, लोखंडी टॉमी, इंधन मोजण्यासाठी लागणारी लोखंडी पट्टी असा एकूण १ लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मंगेश दाभाडे याच्यावर सन २००८, सन २०१६ आणि सन २०१९ मध्ये दारूबंदी कायद्यान्वये चार तसेच सन २०२२ मध्ये मारहाण केल्याचा एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.
अशी व्हायची जेट इंधनाची चोरी..
जेट इंधन भरलेले टॅंकर नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरातून पुणे विमानतळावर येतात. टॅंकरमध्ये इंधन भरताना इंधनाच्या पृष्ठभागावर फेस येतो. त्याच वेळी टॅंकरमधील इंधनाची मोजणी केली जाते. टॅंकर जेव्हा पुणे विमानतळावर येतो तेव्हा फेस कमी झालेला असतो. त्यामुळे त्याची पातळी कमी दाखवली जाते. या तांत्रिक अडचणीचा फायदा आरोपींनी घेतला. हजारो लिटर इंधन भरलेल्या टॅंकरमधून अवघे ७० ते ८० लिटर इंधन काढून घेतल्यास कोणालाही संशय येत नसे. हे इंधन आरोपी काळ्या बाजारात चढ्या दराने विकत असत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक धनराज किरनाळे, सहायक फौजदार नारायण जाधव, संजय गवारे, प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, वासुदेव मुंडे, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.