पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, रस्त्यावरची दहशद, पर्स चोरी, मंगळसूत्र चोरी, चैन चोरी व महिलांची छेडछाड यामुळे रात्रीच्या वेळी महिला घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याने, महिलांमध्ये धाडस, ध्येर्य, व निर्भयता निर्माण करण्यासाठी नाना काटे सोशल फौंडेशनच्या वतीने रात्री १० वाजता ‘महिला सुरक्षा सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांनी ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केली. परिसरातील विविध क्षेत्रातील सुमारे २५० महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
यावेळी पुष्पा संचेती, सायली सुर्वे, मनीषा मचाले, मिथिला डहाके, वैशाली चौधरी यांच्यासह परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.
या रॅलीला शिवार चौकातून सुरुवात करण्यात आली. पुढे कोकणे चौक, गोविंद यशदा चौक, साई अँबियन्स चौक, कुणाल आयकॉन रस्ता मार्गे शिवार चौकात रात्री ११ वाजता रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग नोंदवून समाधान व्यक्त केले. आपला परिसर भयमुक्त राहण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ही महिलांनी यावेळी सांगितले.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना नगरसेविका शीतल काटे म्हणाल्या, धावपळीच्या युगात स्वःताच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास महिलांना वेळ नाही त्याच बरोबर रोजची रस्त्यावरची दहशद त्यामुळे महिला घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मात्र महिलांनी खंबीरपणे अशा वाईट कृतीचा सामना करण्यासाठी पुढे आल्या पाहिजेत. सध्याच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्यामुळे महिलांनी न घाबरता मुक्तपणे वावरले पाहिजे तसेच स्वतःचे आरोग्य, वायू प्रदूषण व रस्त्यावरील वाहतुकीचे संतुलन नियमित चागले ठेवण्यासाठी रोज दिवसातील काही तास तरी सायकल वापरण्याची काळाची अत्यंत गरज आहे.
महिला सुरक्षा सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी नाना काटे सोशल फौंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेत्तले.





















Join Our Whatsapp Group