पिंपरी (Pclive7.com):- आमदार महेशदादा लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात पिंपरी चिंचवड शहरासाठी बरेच काही केले आहे. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी भोसरी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मागण्या मांडून त्या मंजूर करून घेतल्या. शास्ती कर रद्द करण्याचा प्रश्न, उपयोगिता शुल्क रद्द करण्याचा प्रश्न, साडेबारा टक्के जमिनीचा परतावा अशी अनेक उदाहरणे असल्याचे प्रतिपादन बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
निलेश नेवाळे म्हणाले की, आमदार महेशदादा लांडगे हे काम करणारे आमदार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना अनधिकृत बांधकामांना शास्ती कर लागू झाला, तो आमदार लांडगे यांनी रद्द करून घेतला. उपयोगिता शुल्क स्थगित करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. सन १९७२ ते १९८४ दरम्यान प्राधिकरणाने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या, त्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा मिळवून दिला. मोशी कचरा डेपो मध्ये कचऱ्याचा डोंगर झाला होता आमदार महेशदादा लांडगे यांनी विद्युत प्रकल्पासह विविध प्रकल्पांना गती देऊन तेथील नागरिकांना दिलासा दिला. कचऱ्याची दुर्गंधी कमी झाली. पाणीपुरवठ्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका केवळ पवना धरणावर अवलंबून होती. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कोणतेही नियोजन केले जात नव्हते. आमदार महेशदादा लांडगे यांनी आंद्रा प्रकल्पातून, भामा आसखेड मधून ज्यादा पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे भविष्यात शहरातील पाणीपुरवठा आणखी सुरळीत होणार आहे असे नेवाळे यांनी सांगितले.
आमदार महेशदादा लांडगे यांनी मोशी येथे साडेआठशे बेड्सच्या रुग्णालयाचा प्रकल्प मार्गी लावला. संत तुकाराम नगर मधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयानंतर मोशी रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय असणार आहे. पिंपरीतील न्यायालय भाडेतत्त्वावर होते स्वतःची जागा नव्हती. महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नातून सेक्टर नंबर १२ मध्ये न्यायालय उभे राहत आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे काम महेशदादा लांडगे यांनी केले आहे. मोशी येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट उभी राहत आहे तर जाधववाडी येथे सेक्टर नंबर १४ मध्ये सीओईपी उभे राहत आहे त्यातही महेशदादांचे महत्त्वाचे योगदान आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी महेशदादांनी प्रयत्न करून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्यास भाग पाडले. स्वतंत्र जिल्हा होण्यासाठी ज्या ज्या तरतुदी लागतात त्या त्या तरतुदी आमदार महेशदादा यांनी करून घेतल्या आहेत असे नेवाळे यांनी सांगितले.
शिक्षण, क्रीडा क्षेत्रासाठी ही आमदार महेशदादा लांडगे यांनी बरेच कार्य केले आहे. कुस्ती, कबड्डी, रायफल शूटिंग आदी सुविधा महेशदादा लांडगे यांनी प्रचंड पाठपुरावा करून निर्माण केल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहर हे देहू व आळंदीच्या मध्य भागात वसले आहे. आमदार महेशदादा लांडगे यांनी तरुण पिढीला संत साहित्याची माहिती व्हावी यासाठी संतपीठ साकारले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी माध्यमातून संत पिठात संत ज्ञानेश्वर माऊली तसेच संत तुकाराम महाराज यांचे वाङ्मय शिकवले जाते. त्यामुळे जागतिक स्तरावर संत साहित्याची माहिती होणार आहे. जागतिक स्तरावर आपल्या संतांचे विचार पोहोचणार आहेत. अशा पद्धतीने सर्व स्तरावर महेशदादा लांडगे यांनी काम केले असल्याने यावेळी तिसऱ्यांदा त्यांचा विजय निश्चित असल्याचे नेवाळे यांनी सांगितले.