पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावातील पॉवर हाऊस चौकात एका अनधिकृत इमारतीवर विनापरवाना धोकादायक टॉवर उभारण्यात आला आहे. हा टॉवर उभारतेवेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनला तक्रार करून देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार असून यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१, सर्व्हे नं. २२८ पॉवर हाऊस चौक येथे एक अनधिकृतपणे इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. विद्युत व ध्वनी लहरींमुळे लहान मुले व जेष्ठांना गंभीर आजार होऊ शकतो. महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर तक्रार करून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तरी आयुक्तांना या अनधिकृत टॉवरवर कारवाई करावी.
सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, सत्यवान कुदळे, साहेबराव कुदळे, अजय कुदळे, नंदू कुदळे, रामदास वाघेरे यांनी निवेदनाव्दारे ही मागणी केली आहे.






















Join Our Whatsapp Group