पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता बदलाचे वारे वाहत असून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
महापौर नितीन काळजे यांच्याकडे बहल यांनी पदाचा राजीनामा सुपूर्त केला. महापालिकेत पंधरा वर्षानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसला पायउतार व्हावे लागले. पाशवी बहुमत असलेल्या भाजप विरोधात अनुभवी तसेच माजी महापौर असलेल्या योगेश बहल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या विश्वासाने संधी दिली होती. मात्र, बहल यांच्यावर सत्ताधाऱ्यांसोबत मॅनेज झाल्याचे आरोप झाले. पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या आंदोलनाला, कार्यक्रमांना बहल यांनी अनुपस्थिती जाणवली.
बहल यांनी अधून-मधून भाजपवर टीका करण्याचे धाडस दाखवले. मात्र, त्यांच्या टीकेला धार नसल्यामुळे त्यांच्या भुमिकेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संशय निर्माण झाला होता. मागील अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेता बदलाची मागणी होत होती. राष्ट्रवादीचे कारभारी तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही कानावर या तक्रारी गेल्या. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्याची चाहूल लागताच बहल यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.






















Join Our Whatsapp Group