पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापलिकेच्या वतीने नाशिकफाटा उड्डाण पूलावरील रॅम्प तसेच पिंपरी निलखमधील वाय जंक्शन अंडरपास वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या दोन्ही मार्गाचे उद्घाटन संपन्न झाले.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्य शत्रुघ्न उर्फ बापू काटे, तुषार कामठे, नगरसदस्या सुनीता तापकीर, सुलक्षणा धर, आरती चौंधे, निर्मला कुटे, स्विकृत सदस्य माऊली थोरात, शहर भाजपाचे प्रवक्ते अमोल थोरात, माजी नगरसदस्य विजय लांडे, क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानेश्वर जुंधारे, उप अभियंता विजय भोजने, संदेश खडतरे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.
नाशिक फाटा येथे हिंजवडी ते मोशी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सिग्नल विरहीत वाहतूक होण्याच्या दृष्टीने नाशिक फाटा चौकामध्ये उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅम्पमुळे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड व हिंजवडी या भागाकडून येणाऱ्या वाहनांना पिंपरी, चिंचवड, निगडी व मुंबई कडे जाने सोईस्कर होणार आहे. चौकातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नाशिकफाटा चौक सिग्नल विरहित करणे शक्य होणार असून नागरिकांना वेळेत पोहचण्यासाठी मदत होणार आहे.
पिंपळे निलख येथे औंध रावेत बीआरटीएस रस्त्यावर वाय जंक्शन बांधण्यात आला आहे. या अंडरपास ग्रेड सेपरेटरची एकूण लांबी ४९० मीटर इतकी असून रुंदी ७.५ मीटर व उंची ५.५ मीटर इतकी आहे. यामुळे जंक्शन फ्री होणार असून बीआरटीएस बस सेवा जलद होणार आहे. तसेच वाकडहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे.