पिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी अशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याअंतर्गत शहरात मेट्रोचे काम सुरु असून, यामुळे बीआरटी कॉरिडॉरमधील मेट्रोची घुसखोरी महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा खेळखंडोबा झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जुना पुणे-मुंबइ महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि मुंबई-बंगळूरु द्रुतगती मार्ग असे तीन महत्त्वाचे महामार्ग जातात. यापैकी जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत या शहराचा दुतर्फा विस्तार झाला आहे. या महामार्गावरून विनासिग्नल वाहतूक व्हावी, या हेतूने रस्ता रुंदीकरणानंतर ग्रेडसेपरेटर बांधण्यात आला. तसेच सात वर्षांपुर्वी सर्वात पहिले नियोजन असलेला दापोडी ते निगडी हा बीआरटी कॉरिडॉरमधून अद्यापही वाहतूक सुरु झालेली नाही. या महामार्गालगतच पुणे-मुंबई लोहमार्गाचे जाळे पसरले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा एक महत्त्वाचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटीतील समावेशानंतर बहुचर्चित मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या हद्दीतील मेट्रोसाठी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. याअंतर्गत नाशिक फाटा ते पिंपरीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकेची या मार्गावरील बीआरटी न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. याकरिता आयआयटी पवई सारख्या नावाजलेल्या संस्थेकडून सुरक्षित वाहतुकीकरिता सल्ला घेतला जात आहे. या कामाकरिता केंद्र सरकाचे आर्थिक अनुदान घेतले असल्याने, या मार्गावर वाहतूक सुरु करणे महापालिका प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. अन्यथा केंद्राकडून मिळालेले अनुदान सव्याज परत करण्याची नामुष्की ओढवणार आहे.
या मार्गावर बीआरटी सुरु करण्यासाठी महापालिकेने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. या मार्गावरील बसथांबे, सिग्नल यंत्रणा व तांत्रिक बाबींकरिता चार कोटी खर्च केला जात आहे. मात्र, नेमके याच वेळी मेट्रोने फिनोलक्स चौकातील बीआरटी कॉरिडॉरमध्ये घुसून खोदकाम केल्याचे निदर्शनास आल्याने हे काम तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर आतापुन्हा एकदा कासारवाडीत बीआरटी कॉरिडॉरमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. मेट्रोची उभारणी करताना बीआरटी कॉरिडॉरमध्ये कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करण्याच्या अटीवर या कामाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता बीआरटी कॉरिडॉरमध्ये मेट्रोकडून खोदकाम होणार नाही, यावर महापालिका प्रशासनाला लक्ष द्यावे लागत आहे. त्यातच या कामामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भरच पडत आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील दुचाकींची संख्या पाहता, सार्वजनिक वाहतुकीकरिता पुणे-लोणावळा लोहमार्गावर आणखी दोन ट्रॅक नव्याने टाकण्याचे नियोजन आहे. हा मार्ग देखील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच असून, भविष्यात या लोहमार्गाचे विस्तारीकरणाचे काम हाती घेतल्यास ते शहराच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. पुणे-मुंबई महामार्ग, बीआरटी कॉरिडॉर आणि मेट्रोचे या सर्व सार्वजनिक वाहतूक सुसूत्रीकरणासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सध्या तरी मेट्रोच्या घुसखोरीमुळे बीआरटी कॉरिडॉर सुरु करण्याच्या मन:स्थितीत असलेल्या महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा सर्व्हे सुरु केला जाणार आहे. यामुळे आणखी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






















Join Our Whatsapp Group