पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सध्या शहरातील बेकायदेशीर फलक, फ्लेक्स यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. शहरातील विविध भागातील राजकीय सामाजिक सर्वच अनधिकृत फ्लेक्सवर जोरदार कारवाईची मोहीम सुरू केली आहे. हे पथक आज (दि.०५) कारवाईला गेलं. नेत्यांचा अधिकाऱ्याला फोन आला आणि कारवाई न करताच पथक परत फिरलं. महापालिकेचे या अतिक्रमण विरोधी पथकाकडून सर्वसामान्यांना वेगळा आणि राजकीय मंडळींना वेगाने न्याय दिल्याबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शहरात अनधिकृत फ्लेक्सवर कडक कारवाई करा, कोणत्याही पक्षातला असला तरी त्याला थारा देऊ नका, शहर भकास होऊन देऊ नका, असे सक्त आदेश दिले असतानाही राजकीय दबावाला बळी पडून प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस शहरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी गाव येथे दि.४ मे ते १९ मे या कालावधीत भव्य आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरीतील नवमहाराष्ट्र मैदानावर या स्पर्धा होत असून मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागताचा भला मोठा अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आला आहे. आज (दि.०५) रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झाले. मात्र स्पर्धा आयोजकांच्या समर्थकांनी या ठिकाणी मज्जाव करत या अतिक्रमण विरोधी पथकाला हुसकावून लावले. फ्लेक्स काढूनच दाखवाचं मग बघू काय होते ते.. असा दम देखील अधिकाऱ्यांना देण्यात आला.. शेवटी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांनी फोन केला आणि कारवाई न करताच या पथकाला तेथून परतण्याची वेळ आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईवर गंभीर पक्षपाताचे आरोप होत आहेत. सामाजिक संस्था, ज्यांचा उद्देश लोकहिताचा असून, विविध जनकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या या संस्थांना महापालिकेच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेत्यांच्या फ्लेक्स आणि बॅनरबाजीकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे.

सामाजिक संस्थांना त्रास, राजकीय बॅनरवर डोळेझाक..
पिंपरी चिंचवड शहरात अतिक्रमण विरोधी पथक नियमितपणे कारवाई करत असते. या कारवाया करताना सामाजिक संस्था लावलेल्या छोट्या सूचना फलकांवर तात्काळ कारवाई केली जाते, त्यांना नोटीसा पाठवल्या जातात, फलक काढून टाकले जातात किंवा दंड आकारला जातो. परंतु त्याच भागात राजकीय पक्षांचे फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर झळकत असूनही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हे प्रकार अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीतील दुजाभाव दाखवतात.
सामाजिक संस्था म्हणतात.. “सर्वांसाठी एकच नियम हवा”
या प्रकारामुळे सामाजिक संस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “आम्ही समाजहितासाठी काम करत असताना जर आमच्यावरच अन्याय केला जात असेल, तर पुढे समाजसेवा करणे कठीण होईल,” असे मत एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. सामाजिक संस्था या व्यापारी किंवा राजकीय उद्देश न ठेवता कार्यरत असूनही त्यांच्यावरच कठोर नियम लावणे हा अन्याय आहे, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांचाही रोष
सामान्य नागरिकही या पक्षपाती कारवाईबाबत नाराज आहेत. “राजकीय बॅनर रस्त्याच्या कडेला, झाडांवर, सार्वजनिक ठिकाणी लावून शहराची शान घालवत आहेत. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मग नियम फक्त सामाजिक संस्थांसाठीच का?” असा सवाल अनेक सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.






















Join Our Whatsapp Group