पिंपरी (Pclive7.com):- अहमदनगर येथून निघालेला गोमांसने भरलेला टेम्पो पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आणला होता. याची खबर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच हा ६ टन गोमांसने भरलेला टेम्पो पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.२९ रोजी पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अहमदनगर येथून कुरेशी हॉटेलच्या मागच्या गल्लीतून गायी व बैलांची कत्तल करून मुंबई येथे त्यांचे मांस विक्रीसाठी टेम्पो नं. MH.03.CP.1630 मध्ये भरून निघाला होता. याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर गोरक्षकांनी जुना पुणे-मुंबई रस्त्यावर साफळा रचून हा टेम्पो थांबविला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सर्व माहिती देऊन पोलिसांची मदत मागितली. टेम्पो व चालक यांना पोलीस स्टेशन येथे आणून ड्रायव्हर अब्दुल रहमान अति महंमद खान व क्लिनर अहसान महंमद इंद्राशी याच्याकडे पोलीसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यानी अहमदनगर येथून गायी व बैलांची कत्तल करून टेम्पो मुंबई येथील गनीभाई याच्याकडे घेऊन जात आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या समक्ष पशुवैधकीय अधिकारी डॉ. देशपांडे व शिवशंकर स्वामी यांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी गायी व बैलांचे मुंडकी, मोठे मांस व पाय दिसले. यावेळी पिंपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.आर. ठुबल व पोलिस कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य दिले. कसायांना सहकार्य करणाऱ्या शेतकाऱ्यासह गायी कापणारा, गोमांस विकत घेणारा गनीभाई, ड्रायव्हर व गाडी मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 चे कलम 5 ( क ), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. शिवशंकर स्वामी (मानद पशुकल्याण अधिकारी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. यावेळी बजरंग दलाचे कुणाल साठे, अभिजित शिंदे, उपेंद्र बलकवडे, सचिन जवळगे, गौरव पाटील, श्रीकांत कोळी आदींनी गोरक्षकांनी या कारवाईत सहभाग घेतला.






















Join Our Whatsapp Group