पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी फाटा येथील उतारामुळे काळेवाडी फाटा येथून ड्रेनेजमार्गे येणारे घाण पाणी तसेच रहाटणी फाटा चौकातील स्वच्छतागृहाची ड्रेनेजलाईन चोकोप होऊन सर्व घाण पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरून सगळीकडे दुर्गंधीचे वातावरण तयार होत असल्याने स्थानिक रहिवाशांचा अक्षरशः श्वास कोंडला होता. मात्र आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने चोकोप काढून ड्रेनेजची नवीन पाईपलाईन टाकल्याने येथील रहिवाशांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे.

रहाटणी फाटा येथील मुख्य चौकातील ड्रेनेज लाईन चोकोप होऊन याठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहातील सर्व घाण पाणी येथील जयहिंद कॉलनी, सुलभ कॉलनी, नखाते नगर परिसर या भागातील नागरी वस्त्यांमध्ये जात होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी बाबासाहेब त्रिभुवन यांच्याशी संपर्क साधला.

त्रिभुवन यांनी तातडीने महापालिकेच्या ड्रेनेज विभाग, स्थापत्य विभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने ही समस्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर स्थापत्यचे उपअभियंता श्री. बोरसे, कनिष्ठ अभियंता श्री. पवार, ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता धनाजी नखाते व आरोग्य विभागाचे श्री. दरोडे या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याठिकाणी नवीन ड्रेनेजलाईन टाकण्यात आली. तसेच थेट नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरू नये यासाठी कॉलन्यांच्या सुरवातीला पाणी अडविण्यासाठी गतीरोधक उभारण्यात आले.

या कामामुळे परिसरात रस्त्यावर येणारे व नागरी वस्त्यांमध्ये साचणारे घाण दुर्गंधीयुक्त पाणी बंद होणार आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचे आभार मानले आहेत.