पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याला पुढील ३-४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन विभागाने केले आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये सकाळपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाची केवळ रिपरिप सुरू होती. मात्र, सोमवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. काल सकाळपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने सुरुवात झाली आहे. तर काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरू होती. आज मात्र अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. शाळांना सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारीही (दि. १९) आकाश ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

दरम्यान प्रशासनाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्यातील घाट परिसरात ४०-५० किमी प्रतितास वेगाने आणि ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group