मावळ (Pclive7.com):- मावळची भूमी ही संत–महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, भक्ती आणि शक्तीचा वारसा जपणारी भूमी म्हणून ओळखली जाते. याच अध्यात्मिक परंपरेला अधिक बळ देत, वारकरी संप्रदायाचा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि भक्तीचा मळा अधिक फुलावा, या उदात्त हेतूने श्री विठ्ठल परिवार, मावळ यांच्या वतीने कामशेत येथे भव्यदिव्य कीर्तन महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

या अध्यात्मिक महोत्सवाचा मंगलमय प्रारंभ विघ्नहर्ता गणरायाच्या विधिवत पूजेनंतर करण्यात आला. त्यानंतर वारकरी परंपरेचे प्राण असलेल्या टाळ, वीणा आणि मृदंगाचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. मृदंगाच्या थापांमधून आणि टाळांच्या गजरातून संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला असून, एका दिव्य अध्यात्मिक पर्वाची सुरुवात झाल्याची अनुभूती भाविकांना मिळत आहे. यावेळी संपूर्ण कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील करण्यात आली.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ह.भ.प. कबीर महाराज अत्तार यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भक्तीचा मळा खऱ्या अर्थाने फुलून आला. त्यांच्या रसाळ वाणीतून पाझरणाऱ्या विठ्ठलनामाच्या महिम्याने भाविक मंत्रमुग्ध झाले. टाळ–मृदंगाच्या तालावर आणि हरिनामाच्या गजरात अवघी मावळ नगरी दंग झाली होती. हजारो भाविकांच्या अलोट गर्दीने या कीर्तन सोहळ्याला अभूतपूर्व चैतन्य लाभले. हा भव्य कीर्तन महोत्सव सुनील शेळके आणि श्री विठ्ठल परिवार, मावळ यांच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जात असून, तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा कीर्तन सोहळा म्हणून ओळखला जातो. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या सोहळ्याचा लाभ घेत असतात. मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्हा व राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे आवर्जून उपस्थित राहतात.

या कीर्तन महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत नियोजनबद्ध आणि भक्ताभिमुख व्यवस्था. भव्य-दिव्य मंडप, आकर्षक सजावट, उत्कृष्ट आसन व्यवस्था, भोजनाची योग्य सोय आणि वारकऱ्यांसाठी सुयोग्य बसण्याची व्यवस्था यामुळे भाविक समाधान व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील नामवंत व मोठे कीर्तनकार येथे आपली कीर्तनरूपी सेवा देत असल्याने या सोहळ्याला दरवर्षी प्रचंड प्रतिसाद मिळतो.
दरवर्षी वेगवेगळ्या मंदिरांचे भव्य देखावे सादर करणे हे या महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असून, यावर्षीही खास सजावटीमुळे संपूर्ण परिसर अधिकच लक्षवेधी ठरला आहे. अध्यात्म, भक्ती आणि उत्कृष्ट नियोजनाचा संगम साधणारा हा कीर्तन महोत्सव आमदार सुनील शेळके यांच्या लोकाभिमुख आणि श्रद्धाभाव जपणाऱ्या नेतृत्वाची प्रचिती देणारा ठरत असून, महाराष्ट्राच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेत एक नवा मानाचा अध्याय जोडत आहे.
Tags: Sunil Shelke






















Join Our Whatsapp Group