पिंपरी (Pclive7.com):- मागील चार वर्षांत भाजप, सेना सरकारने बेरोजगार तरुणांना दिलेले एकही आश्वासन पुर्ण केले नाही. नोटाबंदी व वाढलेल्या महागाईमुळे छोटे उद्योजक व व्यवसायिक देशोधडीला लागले आहेत. राज्यभर महिला व अल्पवयीन मुलींवर अन्याय, अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील पंधरा दिवसात पिंपरी चिंचवड मध्ये चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. यातील एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे समाजात तीव्र संताप व चिडनिर्माण झाली आहे. यातील पिडीत कुटूंबियांना भेटून धीर देण्याऐवजी पालकमंत्री गिरीष बापट व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहेत. त्यांना जागे करण्यासाठी व आगामी निवडणूकामध्ये भाजप सेनेला घरचा रस्ता दाखविण्यासाठी पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसने आक्रमकपणे आवाज उठवून आंदोलन करावे असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या मासिक बैठकीत साठे बोलत होते. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जैयस्वाल, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष संदेश बोर्डे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवादलाचे शहराध्यक्ष मकर यादव, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, कबीर मोहम्मद, युवक काँग्रेसचे चंद्रशेखर जाधव, शैलेश अनंतराव, जिफीन जॉनसन, परमेश्वर पांचाळ, दिपक जाधव, वैभव किरवे, व्यंकट जाधव, संतोष साळवी, आशिष गालफाडे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्व घटकांना, सर्व धर्मियांना बरोबर घेऊन काम करणारा देशातील सर्वांत जुना राष्ट्रीय पक्ष आहे. युवक काँग्रेसमध्ये घडणा-या कार्यकर्त्यांनाच पुढे पक्षात विविध पदावर काम करण्याची संधी मिळते. युवकांनी समाजात घडणा-या अन्याय, अत्याचाराविरोधात संघटन उभारुन जनजागृती करावी. स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, दरवर्षी एक कोटी नवीन रोजगार, महागाई व पेट्रोल डिझेलचा दर कमी करुन शेतक-यांना हमीभाव देणे, प्रत्येकांच्या बँक खात्यात पंधरा लाख भरणे अशी फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकविण्यासाठी युवकांनी कामाला लागावे असेही सचिन साठे म्हणाले.
स्वागत संदेश बोर्डे, सुत्रसंचालन चंद्रशेखर जाधव व आभार विशाल कसबे यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group