पिंपरी (Pclive7.com):- शबरीमलाच्या महिला प्रवेशाला मल्याळी समाजाचा विरोध दर्शविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मासुळकर कॉलनी मार्गे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आला. यावेळी शबरीमला परंपरांचे रक्षण व संवर्धन करा, सेव्ह शबरीमला, परंपरेचे पालन करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी नगरसेवक बाबू नायर, राजेश पिल्ले, राजीव कुट्टयाटो, नंदकुमार नायर, टी. पी. चंद्रशेखरन नायर, विश्वनाथ नायर, प्रदीप दिवेदी, सिजे मॅथ्यू आदी केरळी बांधव व महिला उपस्थित होते.
शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘महिलांना मंदिर प्रवेश नाकारणं हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही’, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शबरीमलातील ८०० वर्षाची परंपरा आता मोडीत निघणार आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी या निर्णयासंदर्भात लवकरच कोर्टात पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. याला विरोध करण्यासाठी शहराच्या विविध भागांतून केरळी बांधव मोर्चा काढत आहेत.






















Join Our Whatsapp Group