पिंपरी (Pclive7.com):- माहेराहून पैसे आणण्याची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास वल्लभनगर, पिंपरी येथे घडली. विवाहितेच्या नातेवाइकांनी विवाहितेचा खून केल्याचा आरोप करीत चौकीत गोंधळ घातला.
स्नेहा स्वरूप क्षीरसागर (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप मनोहर दीक्षित (५७, रा. पसुरे, ता. भोर) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती स्वरूप ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय ३४), सासू पद्मा ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय ६०), सासरा ज्ञानेश्वर गोविंद क्षीरसागर (६४, सर्व रा. वल्लभनगर, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत स्नेहा आणि स्वरूप यांचा २०१२ साली विवाह झाला होता. विवाहानंतर आरोपींनी फ्लॅट, बाळंतपणाचा खर्च, नवीन गाडी घेणे अशी विविध कारणे सांगून तिच्या वडिलांकडून वेळोवेळी पैसे उकळले. आणखी पैशासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून स्नेहा यांनी रविवारी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
स्नेहाच्या नातेवाइकांनी तिचा खून केला असल्याचा आरोप करीत संत तुकारामनगर पोलिस चौकीत गोंधळ घातला. ‘आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा सासरच्या मंडळींनी गळा आवळून खून केला आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला. शवविच्छेदन अहवालावर आमचा विश्वास नाही. त्यासाठी पुणे येथे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तब्बल चार तासांच्या या तणावानंतर अखेर पोलिसांनी फिर्यादी यांना समजावून सांगत सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group