आयुक्तांनी वादाऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे
पिंपरी (Pclive7.com):- आधुनिकता, औद्योगिक प्रगती आणि आयटी हब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराने गेल्या काही दशकांत झपाट्याने विकास साधला असून या शहराचा समृद्ध वारसा जपण्याची गरज आहे. शहराच्या विकासाबाबत बोलताना नवनियुक्त आयुक्त विजय सूर्यवंशी आणि प्रशासनाने वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहून विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी केले.

विलास लांडे म्हणाले प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिक नगरी नसून कामगारांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे. टाटा, बजाज, फोर्स यांसारख्या मोठ्या उद्योगांसह हिंदुस्थान अँटीबायोटिक्ससारखा देशातील पहिला औषधनिर्मिती कारखाना येथे उभारला गेला. त्यामुळे या शहराला औद्योगिक आणि कामगार नगरी अशी वेगळी ओळख मिळाली. विविध राज्यांतून हजारो कामगार येथे येऊन स्थायिक झाले असून त्यांनी शहराच्या प्रगतीत मोठा वाटा उचलला आहे.
शहराच्या जडणघडणीत अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान असल्याचे सांगताना त्यांनी खासदार शरद पवार, दिवंगत अजितदादा पवार, प्रा. रामकृष्ण मोरे, अण्णासाहेब मगर आणि लक्ष्मणभाऊ जगताप यांचा उल्लेख केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शहरात प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल आणि आधुनिक सुविधा उभारल्या गेल्या. “शहर वाढताना आम्ही प्रत्यक्ष पाहिले असून त्या विकासाचे साक्षीदार आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

याशिवाय शहरात कार्यरत राहिलेल्या अनेक आयुक्तांनीही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे लांडे यांनी सांगितले. दिलीप बंड, श्रीनिवास पाटील, श्रीकर परदेशी, आशिष शर्मा, राजेश पाटील यांसारख्या आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई, स्वच्छता मोहीम आणि शिस्तबद्ध प्रशासन या माध्यमातून शहराच्या विकासात मोलाची भर घातली. त्याच धर्तीवर विद्यमान आयुक्त विजय सूर्यवंशी यांनीही काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड शहराला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक असा समृद्ध वारसा लाभलेला असून केंद्र शासनाच्या विविध योजनांचाही लाभ या शहराला मिळाला आहे. त्यामुळे या विषयावर अनावश्यक राजकारण न करता शहराच्या विकासाची उंची आणखी वाढवावी, असे आवाहन विलास लांडे यांनी केले.



















Join Our Whatsapp Group