
देहूरोड (Pclive7.com):- देहूरोड परिसरात एका ज्वेलर्स व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोन्याचे दागिने रिपेअरिंग व नवीन दागिने तयार करून देण्याच्या बहाण्याने तब्बल २६ लाख ६० हजार रुपयांची आणि ६५७ ग्रॅम सोन्याची फसवणूक करण्यात आली आहे.

देहूरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ जानेवारी २०२६ ते ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सुभाष चौक, मेन बाजार येथील ‘सुंधा ज्वेलर्स’ येथे घडली. या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. अंबालाल जिवाजी सोनी (वय अंदाजे ५६) आणि रोहित अंबालाल सोनी (वय अंदाजे ३०, रा. विकासनगर, किवळे, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी तसेच इतर नागरिकांनी आरोपींवर विश्वास ठेवून दागिने दुरुस्तीसाठी, नवीन दागिने तयार करण्यासाठी तसेच रोख रक्कम दिली होती. मात्र, आरोपींनी हे सर्व दागिने व पैसे परत न देता दुकान बंद करून पलायन केले. या फसवणुकीत फिर्यादीसह सुमारे ४० हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगळे करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group