पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर परिसरात असलेल्या डी वाय पाटील विद्यापीठाच्या राजे राजेश्वरी गर्ल्स हॉस्टेलसमोर ठेवण्यात आलेल्या एका संशयास्पद गिफ्ट बॉक्समुळे शुक्रवारी रात्री मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे सव्वा आठच्या दरम्यान हॉस्टेलच्या प्रवेशद्वाराजवळ एक मोठा गिफ्ट बॉक्स आढळून आला. बॉक्स संशयास्पद वाटल्याने तेथील सुरक्षा रक्षकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पुणे शहरात नुकत्याच घडलेल्या बॉम्बसदृश वस्तू ठेवण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसराची पाहणी करत खबरदारीचा उपाय म्हणून बॉक्सची तपासणी सुरू केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, पोलिसांनी बॉक्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये टेडी बिअर असल्याचे स्पष्ट झाले. कोणतीही धोकादायक वस्तू नसल्याचे समोर आल्यानंतर विद्यार्थिनी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group