पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख येथील डी.पी. रोड आणि विशाल नगर परिसरात आयोजित करण्यात आलेले भव्य स्वच्छता अभियान नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. “स्वच्छ परिसर – सुंदर परिसर” हा संदेश देत नागरिकांनी प्रत्यक्ष श्रमदानातून परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प केला. या अभियानात नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे, भाजपा नेते सचिन साठे, नगरसेविका आरती चोंधे यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज (दि.१६) सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानात नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परिसरातील रस्ते, सार्वजनिक जागा आणि परिसरातील कचरा साफ करत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमासाठी पिंपळे निलख रेसिडेंट असोसिएशन (PNRA), पिंपळवन निसर्ग संवर्धन ग्रुप तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या सोशल प्रोजेक्ट अंतर्गत प्रचितास फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी यावेळी विशेष लक्षवेधी ठरली.

अभियानाच्या समारोपावेळी प्रचितास फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसह सहभागी स्वयंसेवकांना पिंपळे निलख रेसिडेंट असोसिएशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. “स्वच्छता ही केवळ मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले.




















Join Our Whatsapp Group