पिंपरी (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे दि.१७ व १८ मे २०२६ रोजी दुर्मिळ संग्रहांचे विशेष दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. “विभाजित जगाला एकत्र आणणारी संग्रहालये” या यंदाच्या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनातून इतिहास, विज्ञान, कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. संग्रहालये संवाद, समावेशकता, शांतता आणि सांस्कृतिक ऐक्यवाढविण्यास कशी महत्त्वाची भूमिका बजावतात, याचेही दर्शन या प्रदर्शनातून घडणार आहे.

या प्रदर्शनात छंदसम्राट सामाजिक संस्थेशी संबंधित विविध कलाकारांचे दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण संग्रह प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये स्वाक्षऱ्या व छायाचित्रांचा संग्रह, दुर्मिळ नाणी, ‘चंद्रयान’ विषयावरील विशेष संग्रह, दुर्मिळ चित्रे, झेंटॅगन कला तसेच पुरातन वस्तूंचा समावेश आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० अशी राहणार आहे.

यासोबतच प्रेक्षकांसाठी विविध सर्जनशील व विज्ञानाधारित उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ मे २०२६ रोजी आयसर, पुणे यांच्या माध्यमातून पेन प्लॉटर, स्पिन आर्ट आणि ३डी पेन यांसारख्या प्रत्यक्ष सहभागातून अनुभव घेता येतील अशा सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दोन्ही दिवशी दुपारी १२.०० व ३.०० वाजता खुली प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सहभागींसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय पिंपरी चिंचवड प्लॅनेटेरियमच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त १५ ते १७ मे २०२६ दरम्यान विज्ञान प्रात्यक्षिके, कार्यशाळा, खगोल निरीक्षण, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि तारामंडल डोम शो यांचेही आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, कला-संस्कृतीची आवड असणा-या प्रेक्षकांसाठी हा उपक्रम एक विशेष पर्वणी ठरणार असून, शोध, सर्जनशीलता, विज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव या माध्यमातून घेता येणार आहे. सर्व प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवीण तुपे यांनी केले आहे.




















Join Our Whatsapp Group