पिंपरी (Pclive7.com) : पिंपळेगुरव येथील मोरया पार्क परिसरात गुरुवारी रात्री अज्ञात टोळक्याने धिंगाणा घालत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरया पार्क परिसरातील नदीकाठी असलेल्या पार्किंगमध्ये गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी अचानक प्रवेश करून उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक व तोडफोड केली. या घटनेत तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर वाहनमालकांनी संताप व्यक्त केला असून परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या तोडफोडीचे काही व्हिडीओ समोर आले असून त्यामध्ये टोळक्याने केलेला धिंगाणा स्पष्टपणे दिसून येत आहे.
ही घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तोडफोडीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे पिंपळेगुरव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group